जामखेड न्युज – – – – –
चौंडीच्या गर्दीत चैन लंपास करणाऱ्यांचा पर्दाफाश! रेकॉर्डवरील चोरटा ‘एलसीबी’च्या जाळ्यात
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन व पेंडल चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपी राम अर्जुन मुरकुटे (वय ३१, रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २ लाख ४० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जामखेड पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
दि. ३१ मे २०२६ रोजी फिर्यादी नवनाथ विष्णू पडळकर (वय ५१, रा. तांबेनगर, बारामती, जि. पुणे) हे कार्यक्रमासाठी चौंडी, ता. जामखेड येथे आले होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व त्यामधील पेंडल चोरून नेले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अमोल आजबे यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले.

तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना ९ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली. चौंडी येथील चैन स्नॅचिंगचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम अर्जुन मुरकुटे याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.




