कर्जत-जामखेडचा झेंडा प्रदेश पातळीवर! डॉ. भगवानराव मुरूमकर यांची भाजप किसान मोर्चात दमदार एन्ट्री, ठिकठिकाणी सन्मान
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कर्जत-जामखेड तालुक्याचे सुपुत्र, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती भाजपाचे निष्ठावंत डॉ. भगवानराव मुरूमकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आणि किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, मित्रपरिवार व पत्रकारांच्या वतीने विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, नगरपरिषद गटनेते तात्याराम पोकळे, सुनिल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, डॉ. अजय वराट, पुढारी टी सेंटरचे संचालक बंडूशेठ ढवळे, जमीर सय्यद, जाकीर शेख, विजय काशिद, प्रविण बोलभट, विष्णू गंभिरे, अमित जाधव, नागराज मुरूमकर, राळेभात, भंडारी शेठ यांच्या सह कर्जत तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तर पत्रकारांच्या वतीने सत्कार करताना जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, मोहिद्दीन तांबोळी, निलेश वनारसे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मुरूमकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत. दुष्काळ, पीकविमा, कांदा प्रश्न, दुधाचे दर अशा विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहचवला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीनंतर कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, पत्रकार, किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराच्या वतीने डॉ. मुरूमकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, चेअरमन, किसान मोर्चाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुरूमकर यांना पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. मुरूमकर म्हणाले, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवणे, आणि कर्जत-जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रदेश पातळीवर मांडून त्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे पहिले ध्येय असेल.”
या निवडीबद्दल सभापती प्रा राम शिंदे, भाजपाचे आमदार, पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.