अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान २ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असून, मतदानापूर्वीच निवडणुकीच्या वातावरणात खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची भीती व्यक्त करत सहकार परिवर्तन पॅनलने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पॅनलच्या नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
सत्तेच्या गैरवापराची भीती; निष्पक्ष निवडणुकीची मागणी दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सहकार परिवर्तन पॅनलच्या वतीने सत्ताधारी पॅनलकडून राजकीय प्रभाव आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होण्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची तसेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होण्याची भीती व्यक्त करत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे लावा!
मतदान प्रक्रियेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करावा. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक मतदाराची मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी ओळख तपासावी आणि बोगस मतदारांना रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मतदान कक्षातील प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याची मागणी मतदान कक्षात एकावेळी एकाच मतदाराला प्रवेश देण्यात यावा. संबंधित मतदाराचे मतदान पूर्ण झाल्यानंतरच पुढील मतदाराला प्रवेश द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अंध व दिव्यांग मतदारांच्या बाबतीत नियमांनुसार आवश्यक ती पडताळणी करूनच त्यांच्या मदतनीसाला मतदानासाठी सहकार्य करण्याची परवानगी द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिग्गज नेत्यांच्या सह्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन या निवेदनावर खासदार निलेश लंके, माजी खासदार सदाशिव लोखंडे, ॲड. प्रताप ढाकणे आणि ॲड. विद्याधर काकडे यांच्या सह्या आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना सहकार परिवर्तन पॅनलने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याने निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.