खाकीवर वार करणारा निघाला आंतरजिल्हा कुख्यात दरोडेखोर!
जामखेडचा विनोद जाधव 7 वर्षांपासून फरार,बलात्कार, घरफोडी, रेल्वे दरोड्यासह 13 गुन्ह्यांची कुंडली आली समोर
जामखेड शहरातील नागोबा मंदिर परिसरात पाकीट मारताना पकडलेल्या चोरट्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ताजी असतानाच, या हल्लेखोराची गुन्हेगारी कुंडली समोर आल्याने पोलीस दलही हादरले आहे. हल्लेखोराचे नाव विनोद सखाराम जाधव (रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड) असे असून त्याच्यावर जामखेड, बीड, सातारा, मनमाड, मिरज अशा पाच जिल्ह्यांत तब्बल 13 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आणखी काही रेल्वे चे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
काय आहे 13 गुन्ह्यांची यादी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद जाधववर दाखल गुन्हे खालीलप्रमाणे –
1) जामखेड पो.स्टे 204/2011 – कलम 376,363,366 -अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार. (यात तो निर्दोष सुटला आहे)
2) जामखेड पो.स्टे 36/2015 – कलम 457,380 – रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी. हा गुन्हा सध्या कोर्टात प्रलंबित आहे.
3 & 4) पाटोदा (जि. बीड) 97 व 98/2009 -चोरी (379), बेकायदेशीर जमाव (143), सरकारी आदेश भंग (188) व अटकेवेळी पलायन (224).
5 ते 10) सातारा व मनमाड रेल्वे पोलीस – 6 गुन्हे – 2018 साली रेल्वे ऍक्ट 147, 174(सी), 153 अंतर्गत 6 वेगवेगळे गुन्हे. म्हणजे रेल्वेत अवैधरित्या प्रवास, रेल्वे मालमत्तेची चोरी आणि तिकिटाविना प्रवास करून दरोडा टाकण्याचे गुन्हे.
11) जीआरपी मनमाड 648/2018 – कलम 395 – हा सर्वात गंभीर गुन्हा – दरोडा (Dacoity). 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन केलेला सशस्त्र दरोडा.
12 & 13) मिरज रेल्वे 189 व 192/2018 – कलम 395, 120(ब), 356, 379 – दरोडा, कट रचणे, जबरदस्तीने हिसकावणे आणि चोरी. या दोन्ही गुन्ह्यात तो 2018 पासून 7 वर्ष फरार म्हणून दाखवला आहे.
पोलीस तपासात काय समोर आले?
आरोपी विनोद जाधव हा जामखेड तालुक्यात राहत असला तरी त्याचे नेटवर्क सातारा, सांगली, मिरज, मनमाड रेल्वे लाईनवर सक्रिय होते. रेल्वे प्रवाशांना लुटणे, त्यांचे पाकीट, मोबाईल हिसकावणे हा त्याचा मुख्य धंदा होता. जामखेडमध्येही नागेश्वर मंदिर परिसरात तुळजाभवानी मातेचा पलंग दर्शन यात्रेत गर्दीच्या ठिकाणी पाकीट मारताना तो पोलिसांच्या हाती लागला आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्याने थेट खाकी वर्दीवरच प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे पोलीस घोळवे जखमी असताना देखील त्यांनी त्यास सोडले नाही एकदा हातातून निसटला तरी परत त्मास पकडले.
या घटनेनंतर जामखेड पोलिसांनी त्याची जुनी फाईल काढली असता तो 13 गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला सराईत असल्याचे उघड झाले. “आरोपी विनोद जाधव हा सराईत व आंतरजिल्हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर 13 गुन्हे दाखल असून मिरज येथील दोन दरोड्याच्या गुन्ह्यात तो फरार होता.
पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (307) चा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ आक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश आघाव करत आहेत. या घटनेमुळे जामखेड शहरात 13 गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार मोकाट कसा फिरतो? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.