जामखेड न्युज – – – –
सरदार पटेल जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलिसांची ‘एकता दौड’, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा एल्गार!
‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’चा संदेश, पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यासह महाराष्ट्र सायबर जनजागृती मोहीम २०२६ अंतर्गत ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून राष्ट्रीय एकतेसोबतच सायबर सुरक्षिततेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ‘भारत की सुरक्षा, एकता अखंडता को हम सदैव अक्षुण्ण रखेंगे’ या शपथेने झाली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प केला.

त्यानंतर ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ हा संदेश देत एकता दौड काढण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर करावा, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. ‘सुरक्षित इंटरनेट, सुरक्षित आपण! जागरूक नागरिक, सुरक्षित समाज’ या संदेशाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

सोशल मीडिया हनीट्रॅपपासून सावध राहण्याचे आवाहन
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि हनीट्रॅपच्या घटनांबाबत जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या मैत्रीच्या विनंत्या विचार न करता स्वीकारू नयेत. व्हिडिओ कॉलद्वारे होणाऱ्या गैरप्रकारांना बळी पडू नये. आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील तसेच खासगी फोटो व व्हिडिओ कोणासोबतही शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. हनीट्रॅप किंवा सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.




