Friday, September 11, 2026
Home क्राईम न्यूज खर्ड्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर दूध चालकाची कोयत्याने हत्या, ३ ते...

खर्ड्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर दूध चालकाची कोयत्याने हत्या, ३ ते ४ हल्लेखोर फरार

0
2
खर्ड्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर दूध चालकाची कोयत्याने हत्या, ३ ते ४ हल्लेखोर फरार

जामखेड न्युज – – – – – 

खर्ड्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर दूध चालकाची कोयत्याने हत्या, ३ ते ४ हल्लेखोर फरार

खर्डा येथील जामखेड रोडवरील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भरदिवसा एका दूध वाहतूक चालकावर ३ ते ४ अनोळखी इसमांनी हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने खर्डा शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या MH-12-KP-5626 क्रमांकाच्या पिकअप वाहनावर चालक म्हणून काम करत होते. माळेवाडी परिसरातून संकलित केलेले दूध घेऊन ते नियमितपणे खर्डा येथे येत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध घातल्यानंतर ते जातेगाव फाट्याच्या परिसरात गेले असता काही अनोळखी इसमांनी त्यांना तेथे बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बोराटे यांच्याशी संशयितांचा वाद झाला. त्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात एका इसमाने कोयत्याने बोराटे यांच्या मानेवर प्राणघातक वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

गंभीर जखमी अवस्थेतील बोराटे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
फॉरेन्सिक टीमकडून पुरावे संकलन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली असून, महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच परिसरातील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

भरदिवसा झालेल्या या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याचा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

फरार हल्लेखोरांचा शोध सुरू
हल्ल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास एपीआय उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत. या हत्याकांडामागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख तपासातून स्पष्ट होणार आहे.

जातेगाव फाट्यासारख्या वर्दळीच्या परिसरात सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे खर्डा शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!