जामखेड कृषी महाविद्यालय हादरले! रॅगिंगच्या नावाखाली प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला खोलीत घुसून काठ्यांनी मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला सिनिअर विद्यार्थ्यांनी खोलीची कडी तोडून आत घुसून लाकडी काठी आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ४ जणांची नावे निष्पन्न करून इतर ५ ते ६ अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वेदांत दगडू तळुले (वय १८, रा. निमगाव घाणा, ता. अहिल्यानगर). त्याने याच वर्षी १२ वी उत्तीर्ण होऊन बी.एस्सी. ॲग्रीसाठी हाळगाव महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दि. ७ सप्टेंबर – रॅगिंगची सुरुवात फिर्यादी दि. ३ सप्टेंबर रोजी हाळगाव येथे ॲडमिशन घेऊन E-4 रूममध्ये राहण्यास आला. दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता तो कॉलेजमध्ये आला. रात्री १०.१५ वाजता तो आपल्या दोन नवीन मित्रांसह रूममध्ये आराम करत असताना काही सिनिअर मुले दारात आली. त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगून फिर्यादीला नाईट ड्रेसवरच त्यांच्या रूममध्ये बोलावले. तेथे त्याचा मोबाईल काढून घेत, रांगेत उभे करून खाली मान घालून उभे राहण्यास भाग पाडले व “आम्ही सांगू तसेच वागावे लागेल” अशी दमदाटी केली. फिर्यादीने याची माहिती वसतिगृहाचे रेक्टर विवेकानंद कुलकर्णी यांना दिली. रेक्टरने मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
दि. ८ सप्टेंबर – तक्रारीचा राग आणि जीवघेणी मारहाण रेक्टरकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून दि. ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२.१५ वाजता सिनिअर विद्यार्थ्यांनी फिर्यादी झोपलेला असताना त्याच्या खोलीची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. त्यांनी फिर्यादीला हातावर, पाठीवर, पोटावर काठीने तर डोक्यात आणि बरगडीवर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाण करताना आरोपी शिवीगाळ करत म्हणाले, “तू रेक्टरला फोन करून आमची तक्रार केली काय? तुला येथे शिकायचे असेल तर आम्ही सांगू तसेच वागावे लागेल.”
आरडाओरडा ऐकून रेक्टर धावून आले. त्यावेळी फिर्यादीच्या शेजारील रूममधील दोन मित्रांनाही मारहाण झाल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर आरोपींनी हॉस्टेलच्या मध्यभागी जमाव करून रेक्टरसमोरच “पोलीस स्टेशनला फोन करा, पोलीस आमचे काय करणार आहेत” असे म्हणून पोलिसांनाही आव्हान दिले.
घाबरलेल्या विद्यार्थ्याने डायल ११२ वर कॉल केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दि. ९ सप्टेंबर रोजी सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेऊन त्याने वडिलांसोबत जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी ऋतीक दत्तात्रय शेळके, पियुष कुंभार, सुशील हेमंत मालकाने आणि प्रतिक कुमार वाघमोडे या चौघांविरुद्ध आणि इतर अनोळखी ५-६ जणांविरुद्ध गु.र.नं. ६३०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९९ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे हाळगाव कृषी महाविद्यालयाच्या शिस्तीवर आणि वसतिगृहातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
पुढील तपास पो.नि. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. बी सोनवणे करत आहेत.