केक कापण्याऐवजी ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे निलेश (दादा) मराठे महान कार्य
मुलाच्या वाढदिवशी मावळ (पुणे) येथून धनगरवस्ती शाळेला मदत
वाढदिवस म्हटला की केक कापणे, मित्र-नातेवाईकांसोबत आनंद साजरा करणे आणि विविध प्रकारे खर्च करण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्या शाळेला मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम निलेश (दादा) मराठे, मावळ, पुणे यांनी राबविला आहे. त्यांच्या मुलगा शिवांक याच्या वाढदिवसानिमित्त धनगरवस्ती शाळेस ११०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
तालुक्यातील देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्तीच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. दि. २ सप्टेंबर रोजी मुंबईतील जवाहर बालभवन येथे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन’ बैठकीत शिक्षक लहू बोराटे यांना आपल्या शाळेतील विविध प्रयोग व उपक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती. यामुळे या शाळेचे नाव राज्यात चमकले आहे.
धनगरवस्ती, देवदैठण येथील शाळेत शिक्षक लहूजी बोराटे यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्याऐवजी शाळेच्या शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय मराठे कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे शिवांकचा वाढदिवस केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न राहता विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
शाळेला मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी तसेच शाळेच्या आवश्यक कामांसाठी उपयोगी पडणार आहे. आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला मदत करण्याचा मराठे कुटुंबीयांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
आजच्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यापेक्षा त्या खर्चातील काही भाग गरजू विद्यार्थी, शाळा, सामाजिक संस्था किंवा समाजोपयोगी कार्यासाठी देणे ही काळाची गरज आहे.
निलेश (दादा) मराठे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा निर्णय त्याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. ‘आपला आनंद इतरांच्या उपयोगी आला, तरच त्या आनंदाला खरा अर्थ प्राप्त होतो,’ या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतीचे परिसरातून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी पद्धत समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी आणि आदर्श ठरत आहे.