जामखेडमध्ये वस्तऱ्याने थरार! किरकोळ वादातून सहा जणांवर हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
जामखेड शहरातील कुंभारठळ परिसरात किरकोळ वादातून सहा जणांना वस्तऱ्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अनिकेत दीपक चव्हाण व माया दीपक चव्हाण (दोघे रा. कुंभारठळ, जामखेड) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या आरोपांनवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील फिर्यादी व नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत देवीदास लक्ष्मण फुलमाळी (वय ३२, व्यवसाय भाजीपाला व्यापार, रा. कुंभारठळ, जामखेड, हल्ली रा. पनवेल, जि. रायगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फुलमाळी कुटुंबीय धार्मिक कार्यक्रम व नागपंचमी यात्रेनिमित्त जामखेड येथे आले होते. फिर्यादीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आरडाओरड व गोंधळाचा आवाज ऐकू आल्याने देवीदास फुलमाळी बाहेर आले. त्यावेळी त्यांची मेहुणी सुष्मा रामा फुलमाळी व सासू मालन रामा फुलमाळी यांचा अनिकेत चव्हाण याच्यासोबत वाद सुरू होता.
भांडण सोडवण्यासाठी देवीदास फुलमाळी यांच्यासह किरण गोटीराम फुलमाळी, राहुल रामा फुलमाळी, रामा बजरंग फुलमाळी व मुसलाबाई गोटीराम फुलमाळी हे गेले असता अनिकेत चव्हाण याने हातातील वस्तऱ्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात सुष्मा फुलमाळी यांच्या गळ्याच्या उजव्या बाजूस, मालन फुलमाळी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व खांद्यावर, देवीदास फुलमाळी यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस, किरण फुलमाळी यांच्या हातावर, राहुल फुलमाळी यांच्या हातावर, रामा फुलमाळी यांच्या कपाळावर तसेच मुसलाबाई फुलमाळी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, माया दीपक चव्हाण हिने शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जखमींना पोलिसांनी दवाखाना मेमो दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचार करण्यात आले.
या घटनेप्रकरणी देवीदास फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून अनिकेत दीपक चव्हाण व माया दीपक चव्हाण यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या आरोपांनवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील फीर्यादी व नातेवाईकांनी केली आहे.