Wednesday, August 26, 2026
Home ताज्या बातम्या रत्नापूर शिवारात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्याचा फडशा, वनविभागाकडून पाहणी

रत्नापूर शिवारात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्याचा फडशा, वनविभागाकडून पाहणी

0
2
रत्नापूर शिवारात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्याचा फडशा, वनविभागाकडून पाहणी

जामखेड न्युज – – – – 

रत्नापूर शिवारात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्याचा फडशा, वनविभागाकडून पाहणी

जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रानमळा वस्ती परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी एका पाळीव कुत्र्यावर अनोळखी वन्यप्राण्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना समोर आली. घटनास्थळी प्राण्याचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.

रत्नापूर शिवारातील रानमळा वस्तीवर पाळीव कुत्र्यावर हल्ला झाल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पाहणी केली असता अनोळखी प्राण्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जामखेड परिसरातील सौताडा घाट भागातही नागरिकांना बिबट्या दिसून आल्याचे समोर आले होते. आता रत्नापूर शिवारात पाळीव कुत्र्यावर हल्ल्याची घटना घडल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता हराळ यांनी वनपाल नारायण दराडे, शांतीनाथ सपकाळ व रवी राठोड यांना घटनास्थळी पाठविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आढळून आलेल्या ठशांची खात्री केली. नागरिकांनी घाबरून न जाता मात्र आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
शेतात जाताना विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी एकटे जाणे टाळावे. शक्यतो दोन-तीन जणांच्या समूहाने शेतात जावे. सोबत टॉर्च व काठी ठेवावी आणि परिसरात मानवी वर्दळ व आवाज राहील याची काळजी घ्यावी.

लहान मुले व वृद्ध व्यक्तींना संध्याकाळनंतर घराबाहेर किंवा शेतात एकटे पाठवू नये. पाळीव कुत्रे, वासरे, शेळ्या यांना उघड्यावर बांधण्याऐवजी सुरक्षित गोठ्यात ठेवावे. गोठे शक्यतो जाळीने सुरक्षित करावेत.

घराभोवती व गोठ्याजवळ वाढलेली झुडपे, गवत व दाट वनस्पती काढून परिसर स्वच्छ ठेवावा. दाट पिकांमध्ये किंवा उसाच्या शेतात काम करताना आजूबाजूला सतत लक्ष ठेवावे.
बिबट्या दिसल्यास काय करू नये?
बिबट्या दिसल्यास त्याच्या मागे धावू नये, दगड मारू नये किंवा त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्याची पिल्ले आढळल्यास त्यांना हात लावू नये किंवा उचलून आणू नये. परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

तसेच सोशल मीडियावर जुने व्हिडिओ, फोटो किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रत्नापूर परिसरात बिबट्याच्या वावराची शक्यता लक्षात घेता वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील काळात या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!