नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या पुढाकारातून अनाथ बालकांना मिळाला आनंदाचा अविस्मरणीय क्षण
मोहा येथील ॲड. डॉ. अरुण जाधव संचलित निवारा बालगृहातील सुमारे ७२ अनाथ बालकांना जामखेड येथील आनंदनगरीचा मनमुराद आनंद लुटता आला. जामखेड नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या पुढाकारातून या बालकांना आनंदनगरीतील विविध मनोरंजनाच्या साधनांचा लाभ देण्यात आला. या वर्षी नगरपरिषदेच्या माध्यमातून आनंदनगरीचे अत्यंत देखणे नियोजन करण्यात आले आहे. याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आनंदनगरीत पोहोचल्यानंतर बालकांनी आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, रेल्वे यांसह विविध मनोरंजनाच्या साधनांचा आनंद घेतला. या वेळी बालकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. रोजच्या जीवनातील अनेक अडचणींमध्ये वाढणाऱ्या या बालकांना काही काळ मनमोकळेपणाने आनंद घेण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.
या प्रसंगी बालकांनी प्रांजलताई चिंतामणी यांचे आभार मानले. “प्रांजलताई चिंतामणी यांनी आम्हाला आनंदनगरीचा आनंद मिळवून दिला. तसेच सर्वांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था केली. हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. आम्ही प्रांजलताईंचे मनापासून आभारी आहोत,” अशी भावना बालकांनी व्यक्त केली.
नगरपरिषदेच्या माध्यमातून बालकांसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, सभापती श्रीराम डोके, ॲड. प्रविण सानप, नगरसेवक विकी घायतडक, अशोक शेळके, प्रविण चोरडिया, नंदाताई होळकर, प्रविण होळकर यांच्यासह निवारा बालगृहातील सुमारे ७२ बालके उपस्थित होती.
या उपक्रमामुळे निवारा बालगृहातील बालकांना आनंदाचे काही अविस्मरणीय क्षण अनुभवता आले असून, सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.