नान्नजमध्ये ‘गाव बंद’वरून वातावरण तापले, राजेभोसले विरूद्ध पवार राजेभोसले गटाकडून ९ ऑगस्ट रोजी गाव कडकडीत बंदचा इशारा,बळजबरीने दुकाने बंद पाडू नयेत माजी सरपंच पवारांचे तहसीलदार यांना निवेदन
नान्नजमध्ये ‘गाव बंद’वरून वातावरण तापले, राजेभोसले विरूद्ध पवार
राजेभोसले गटाकडून ९ ऑगस्ट रोजी गाव कडकडीत बंदचा इशारा,बळजबरीने दुकाने बंद पाडू नयेत माजी सरपंच पवारांचे तहसीलदार यांना निवेदन
तालुक्यातील नान्नज येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी नान्नज गाव कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. शहाजी राजेभोसले यांनी प्रलंबित मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने उपोषण सुरू केले असून, त्यांच्या मागण्या रास्त व जनहिताच्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तसेच ग्रामस्थांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास रविवारचा बंद अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गाव बंदनंतरही प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास जामखेड-करमाळा मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
माजी सरपंचांचे तहसीलदारांना निवेदन
नान्नज गाव बंद ठेवण्याच्या आवाहनावरून माजी सरपंच संतोष उत्तमराव पवार यांनी जामखेड तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे. काही व्यक्तींकडून इतर लोकांच्या मदतीने उद्या बळजबरीने गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला असून, याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
नान्नज हे सुमारे सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव असून, सर्वसामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचा दैनंदिन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाह आहे. त्यामुळे गाव बंदचा थेट परिणाम व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारावर होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
गाव बंद ठेवण्यासाठी काही व्यक्तींकडून आवाहन करण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींविषयी विविध आरोप करण्यात आले असून, त्याबाबत प्रशासनाने वस्तुस्थिती तपासून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. उपोषण हे गावच्या विकासासाठी नसून स्वतः च्या फायद्यासाठी आहे असे निवेदनात म्हटले आहे.
‘बळजबरीने व्यवसाय बंद पाडू नये’ गाव बंदच्या नावाखाली कोणत्याही व्यापारी, व्यावसायिक किंवा शेतकऱ्याला बळजबरीने दुकान अथवा व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडू नये, अशी भूमिका माजी सरपंच संतोष पवार यांनी मांडली आहे. गाव बंददरम्यान व्यापारी किंवा शेतकऱ्यांना त्रास झाल्यास त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बळजबरीने दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. नान्नज गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तहसील प्रशासन व पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे शहाजी राजेभोसले यांच्या उपोषणाला पाठिंबा देत ग्रामस्थांनी गाव बंदचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे गाव बंदच्या पद्धतीवर आक्षेप घेत माजी सरपंच संतोष पवार यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे नान्नजमध्ये उद्याच्या गाव बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका आणि कायदा-सुव्यवस्थेबाबतची तयारी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा आणि त्याचबरोबर गावातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत राहतील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.