जामखेड शहरातील मुख्य वर्दळीचा असलेल्या बीड रोडवरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने आणि अर्धवट अवस्थेत रखडले आहे. रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणाऱ्या नाल्यांचे कामही अपूर्ण असल्याने त्याचा फटका आता थेट सामान्य नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांना बसत आहे.
काल झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात बीड रोडवरील नाल्यांचे पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहू लागले आणि थेट व्यापाऱ्यांच्या दुकानात, मेडिकल स्टोअर्समध्ये, खाजगी दवाखान्यांमध्ये आणि घरांमध्ये शिरले.
व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान अचानक शिरलेल्या पाण्यामुळे अनेक दुकानांमधील साहित्य भिजले, मेडिकल मधील औषधे खराब झाली, तर किराणा दुकानातील धान्याचे नुकसान झाले. दवाखान्यात आलेल्या रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागला. काही घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष बीड रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्या अर्धवट सोडल्याने पाण्याला वाटच मिळाली नाही. पाणी जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आणि तेथून दुकानात शिरत आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
व्यापाऱ्यांची मागणी येत्या २ दिवसात नाल्यांचे काम पूर्ण करून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बीड रोडवरील व्यापारी असोसिएशनने दिला आहे.
“आम्ही टॅक्स भरतो, पण सुविधा शून्य. पहिल्याच पावसात दुकानात पाणी शिरले तर पुढे पावसाळा कसा काढायचा?” संतप्त व्यापारी या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.