पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपचा अनोखा ‘आशीर्वादाचा दिवा’ सोहळा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा शहर मंडळाच्या वतीने शहरातील श्री शनि मारुती मंदिरात अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात ७६ दिवे प्रज्वलित करून ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. श्री गणेश व हनुमानाची आरती करून नरेंद्र मोदी यांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली.
या अनोख्या उपक्रमामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. दिव्यांच्या प्रकाशात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय (काका) काशिद, जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, भाजपा गटनेते तात्यासाहेब पोकळे, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, शिक्षक नेते प्रा. संजय राऊत, शहर चिटणीस माऊली अंदुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह बाळासाहेब दळवी, डॉ. अविनाश बांगर, युवक अध्यक्ष ऋषिकेश मोरे, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, गणेश डोंगरे, अर्जुन म्हेत्रे, प्रविण होळकर, संजय बेरड, माऊली राळेभात आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन शहर सरचिटणीस माऊली दादा अंदुरे यांनी केले. सहसंयोजक म्हणून डॉ. अशोक बांगर व विजय कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून भाजपा कार्यकर्त्यांनी धार्मिक प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ७६ दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले शनि मारुती मंदिर आणि भक्तिमय वातावरणात झालेली आरती यामुळे हा वाढदिवस सोहळा जामखेडमध्ये चर्चेचा विषय ठरला.