Tuesday, September 22, 2026
Home ताज्या बातम्या रॅगिंग प्रकरणात कृषी महाविद्यालयाचा मोठा दणका! सहा विद्यार्थी एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून...

रॅगिंग प्रकरणात कृषी महाविद्यालयाचा मोठा दणका! सहा विद्यार्थी एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून कायमची हकालपट्टी

0
2
रॅगिंग प्रकरणात कृषी महाविद्यालयाचा मोठा दणका! सहा विद्यार्थी एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून कायमची हकालपट्टी

जामखेड न्युज – – – – – – 

रॅगिंग प्रकरणात कृषी महाविद्यालयाचा मोठा दणका! सहा विद्यार्थी एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून कायमची हकालपट्टी

हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग व मारहाण केल्याच्या प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार एकूण सहा विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

तसेच या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले असून, प्रत्येक विद्यार्थ्यावर एक हजार रुपये नुकसानभरपाईचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांसोबत ७ सप्टेंबर रोजी रात्री रॅगिंगचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला होता. रात्री सुमारे १०.१५ वाजता काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी फिर्यादी वेदांत तळुले व त्यांच्या दोन मित्रांना फॉर्मल कपड्यांमध्ये आपल्या खोलीत बोलावून घेतले. यावेळी त्यांचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे करून मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

त्यानंतर फिर्यादी विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या रेक्टरकडे घटनेची माहिती दिली. रेक्टरने संबंधित वरिष्ठ विद्यार्थ्यांना समज देऊन आपापल्या खोल्यांमध्ये जाण्यास सांगितले.तक्रार केल्याचा राग; मध्यरात्री विद्यार्थ्याच्या खोलीत प्रवेश
रेक्टरकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी फिर्यादीच्या खोलीचा दरवाजा व कडी तोडून आत प्रवेश केल्याचा आरोप आहे. ‘तू रेक्टरकडे आमची तक्रार का केलीस?’ असा जाब विचारत विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या घटनेत विद्यार्थी जखमी झाला.
घटनेनंतर पीडित विद्यार्थ्याने तत्काळ डायल ११२ वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर विद्यार्थ्याने जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेक्टर व प्राचार्यांच्या मदतीने संबंधित वरिष्ठ विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर चार विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्राचार्यांकडून पाच सदस्यीय चौकशी समिती
या गंभीर घटनेनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सोनवणे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी करून आपला अहवाल महाविद्यालय प्रशासनाकडे सादर केला.
या अहवालात पोलिस तक्रारीतील चार विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी तसेच अन्य तीन विद्यार्थी असे एकूण सहा विद्यार्थी दोषी आढळले. त्यानुसार महाविद्यालय प्रशासनाने सहाही विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
दोषी विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले असून, प्रत्येकी एक हजार रुपये नुकसानभरपाईचा दंड करण्यात आला आहे.

चौकट
चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई — प्राचार्य दत्तात्रय सोनवणे

या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात पोलिस तक्रारीतील चार विद्यार्थ्यांपैकी तीन आणि अन्य तीन असे एकूण सहा विद्यार्थी दोषी आढळले. समितीच्या अहवालानुसार या सहा विद्यार्थ्यांवर प्रशासनाने एका सत्राच्या निलंबनासह वसतिगृहातून कायमस्वरूपी हकालपट्टी आणि प्रत्येकी एक हजार रुपये नुकसानभरपाईचा दंड अशी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!