जामखेड न्युज – – – – –
जामखेडच्या शेतकऱ्यांना हक्काचे निवासस्थान; शेतकरी भवनाचे प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आल्यानंतर त्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निवासस्थान मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन हे शेतकऱ्यांसाठी हक्काचे निवासस्थान ठरेल. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासन सर्वोच्च प्राधान्य देत असून अशा लोकाभिमुख विकासकामांना शासनाकडून भविष्यातही आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा.राम शिंदे बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, पणन संचालक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे,सहाय्यक निबंधक तथा बाजार समिती सचिव दिलीप तिजोरे, डॉ भगवानराव मुरूमकर, अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



