Wednesday, September 9, 2026
Home ताज्या बातम्या बैलपोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे सावट! पाऊस गायब अन् बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळही ठप्प ...

बैलपोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे सावट! पाऊस गायब अन् बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळही ठप्प शेतकरी हवालदिल, व्यापारी चिंतेत भूतवडा तलावातील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर

0
2
बैलपोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे सावट! पाऊस गायब अन् बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळही ठप्प   शेतकरी हवालदिल, व्यापारी चिंतेत भूतवडा तलावातील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर

जामखेड न्युज – – – – – 

बैलपोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे सावट! पाऊस गायब अन् बाजारपेठेत शेतकऱ्यांची वर्दळही ठप्प

शेतकरी हवालदिल, व्यापारी चिंतेत भूतवडा तलावातील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर

कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यावर यंदा पुन्हा एकदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. बहुतांश शेती जिरायती असल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची यंदा पावसाने मोठी निराशा केली आहे. नागपंचमीच्या सणापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता बैलपोळा सण तोंडावर आला असतानाही वरुणराजाच्या दमदार आगमनाची प्रतीक्षा कायम आहे.

जामखेडची नागपंचमी ही राज्यभर प्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या काळात नृत्यांगनांच्या घुंगरांचा आवाज झाला की पाऊस येतो, अशी भाबडी समजूत अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये आहे. मात्र यंदा घुंगरांचा निनाद झाला, नागपंचमीचा उत्सव झाला; तरीही पावसाने मात्र जामखेड तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.

आता शेतकऱ्यांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा बैलपोळा सण समोर आला आहे. बैलांना सजवून, त्यांची पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सण यंदा मात्र दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिकांची परिस्थिती चिंताजनक असताना सणासाठी खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
बाजारपेठेत साहित्य सज्ज; ग्राहक मात्र गायब!


बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बैलांच्या सजावटीसाठी लागणारे हिंगुळ, कासरे, मण्यांच्या माळा, गोंडे तसेच विविध सजावटीचे साहित्य दुकानात आणून ठेवले आहे. मात्र दरवर्षी पोळ्याच्या काही दिवस आधी गजबजणाऱ्या बाजारपेठेत यंदा शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने सणासाठीची खरेदी कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे दुष्काळाचा फटका केवळ शेतीला नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनाही बसताना दिसत आहे.

भूतवडा तलावाचीही चिंता वाढली
जामखेड शहराची ‘जलसंजीवनी’ म्हणून ओळख असलेल्या भूतवडा तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. उपलब्ध साठा आणखी काही काळच पुरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच नगरपरिषदेकडून शहराला सध्या सुमारे दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्येही पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

पाऊस लांबल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बैलपोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे सावट असतानाच जामखेडकरांसमोर येणाऱ्या काळातील पाणीप्रश्नाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गणपतीबाप्पाच्या आगमनाकडे आशेने डोळे
बैलपोळ्यानंतर गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. गणरायाच्या आगमनासोबत तरी वरुणराजा जामखेडवर कृपादृष्टी करेल आणि पावसाची प्रतीक्षा संपेल, अशी आशा शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाने हजेरी लावून दुष्काळाचे सावट दूर करावे आणि शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद यावा, अशीच जामखेडकरांची अपेक्षा आहे.

चौकट

५५ वर्षांचा व्यवसाय; यंदा मात्र ग्राहकांची प्रतीक्षा!
“गेल्या पंचावन वर्षांपासून आम्ही बैलांच्या सजावटीच्या साहित्याचा व्यवसाय करत आहोत. जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यंदा पावसाअभावी अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बैलपोळ्यासाठीचे साहित्य दुकानात आणून ठेवले आहे; परंतु शेतकरी खरेदीसाठी अद्याप मोठ्या प्रमाणात आलेले नाहीत. त्यामुळे या साहित्याचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
— तुषार कुकरेजा, व्यापारी

 

चौकट

बोअरवेल दुरुस्तीला प्राधान्य देणार — नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
“बैलपोळा सणावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. मात्र त्याचबरोबर जामखेडकरांचा दैनंदिन पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडविणे गरजेचे आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या-ज्या ठिकाणी बोअरवेल आहेत, मात्र त्या सध्या वापरात नाहीत, अशा बोअरवेलची दुरुस्ती करून त्या पूर्ववत सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासन तत्परतेने प्रयत्न करत आहे.”
— प्रांजल ताई चिंतामणी, नगराध्यक्षा, जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!