Wednesday, July 22, 2026
Home क्राईम न्यूज श्रद्धेचा गैरफायदा! अष्टगंध लावण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याची लूट, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

श्रद्धेचा गैरफायदा! अष्टगंध लावण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याची लूट, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

0
2

जामखेड न्युज – – – – – 

श्रद्धेचा गैरफायदा! अष्टगंध लावण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याची लूट, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

देवाचा अष्टगंध लावण्याचा बहाणा करून एका वृद्ध शेतकऱ्याला विश्वासात घेत गप्पांमध्ये गुंतवून त्याच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व खिशातील रोख रक्कम हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना खर्डा बसस्थानक परिसरात घडली. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खर्डा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील वाकी येथील नाना सिताराम धावडे (वय ६७) हे पत्नीसोबत शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी (दि. १६) ते खर्डा येथे आठवडी बाजारासाठी आले होते. बाजारातील खरेदी आटोपल्यानंतर दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ते गावाकडे जाण्यासाठी खर्डा बसस्थानकावर एसटीची प्रतीक्षा करत उभे होते.

याचवेळी एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. “बाबा, देवाचा अष्टगंध लावा,” असे सांगत त्याने धावडे यांना अष्टगंध लावण्याचा आग्रह केला.

बसस्थानकावर गर्दी असल्याचे सांगून त्याने त्यांना जवळच असलेल्या झाडाजवळ नेले. तेथे अष्टगंध लावल्यानंतर “मला लातूरला जायचे आहे, बस कुठे लागते?” अशी विचारणा करत त्याने धावडे यांच्याशी संवाद सुरू ठेवला.

गप्पांमध्ये गुंतलेल्या धावडे यांना काही कळण्याच्या आत आरोपीने त्यांच्या गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम, कानातील दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या काड्या तसेच खिशातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

घटना लक्षात येताच धावडे यांनी बसस्थानक परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. काही वेळाने त्यांचा पुतण्या दिनेश रावसाहेब धावडे बसस्थानकाजवळ भेटला. त्याला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

या घटनेत पाच हजार रुपये रोख, दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम आणि दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील काड्या असा एकूण सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!