जामखेड न्युज – – – – –
वढू बुद्रुकमध्ये हजारो दिव्यांनी उजळले शंभूराजांचे समाधीस्थळ! संजयकाका काशिद दाम्पत्याचा सालाबादप्रमाणे दीपोत्सवात सहभाग!
जामखेडच्या शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला मानाचा मुजरा!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि अद्वितीय बलिदानाच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील त्यांच्या पवित्र समाधीस्थळी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने समाधी परिसर उजळून निघाला. या दीपोत्सवाच्या माध्यमातून शंभूराजांच्या तेजस्वी इतिहासाला आणि स्वाभिमानी विचारांना मानाचा मुजरा करण्यात आला.

जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजयकाका काशिद आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद या दाम्पत्याने सालाबादप्रमाणे यंदाही वढू बुद्रुक येथे उपस्थित राहून दिवे प्रज्वलित केले. शंभूराजांच्या समाधीस्थळी दीप प्रज्वलित करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या दीपोत्सवात जामखेड शहरातील तसेच वढू बुद्रुक परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला. उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेचे स्मरण करत अभिवादन केले.

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पराक्रमाचा इतिहास नसून अन्यायासमोर न झुकता स्वाभिमानासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या बलिदानातून मिळणारी राष्ट्रनिष्ठा, धैर्य, स्वाभिमान आणि संघर्षाची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या दीपोत्सवामागील भावनिक आणि प्रेरणादायी उद्देश आहे.




