अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यापासून ते हजारो वृक्ष लावण्यापर्यंत… संजू काकांच्या सामाजिक कार्याचा गौरव!.. जामखेडच्या संजय कोठारी यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित!
अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यापासून ते हजारो वृक्ष लावण्यापर्यंत… संजू काकांच्या सामाजिक कार्याचा गौरव!..
जामखेडच्या संजय कोठारी यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित!
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र धावून जाणे, हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न, हजारो वृक्षांचे रोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि निराधारांना मदतीचा हात अशा विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकीचा वसा जपणारे जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय मनसुखलाल कोठारी (संजू काका) यांना प्रतिष्ठेच्या ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या सामाजिक योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाल्याने जामखेडच्या सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘मेरा धरती सूरज परिवार, अहिल्यानगर’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या पुढाकारातून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या योगदानाची समाजाला ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
अपघातग्रस्तांसाठी देवदूत; हजारो गरजूंना मदतीचा हात! संजय कोठारी यांनी सामाजिक कार्याचा केवळ पुरस्कारापुरता विचार न करता प्रत्यक्ष कृतीतून माणुसकी जपली आहे. रस्ते अपघातात सापडलेल्या जखमींना तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कडक उन्हाळ्यात पाणपोई सुरू करणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पुस्तके वाटप, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत तसेच पंढरपूर आणि शिर्डीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांना सहकार्य अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव या पुरस्कार सोहळ्यात कॅप्टन लक्ष्मण भोरे यांना ‘आदर्श देशभक्त पुरस्कार’, नान्नज येथील मनीषाताई मोहळकर यांना ‘महिलाभूषण पुरस्कार’, तर सारोळा येथील अनिता दत्तात्रय ढोले यांना ‘मानवसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारार्थींचा सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
२,५०० जणांना रोजगार; संतोष पवार यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी या सोहळ्याचे आयोजक संतोष पवार यांचा ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीतून यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही प्रेरणादायी आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळविले. विशेष म्हणजे, त्यांच्या माध्यमातून तब्बल २,५०० लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती आहे. स्वतःच्या प्रगतीसोबतच इतरांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.
दिव्यांग व निराधारांना अन्नदान, जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप पुरस्कार वितरणाबरोबरच दिव्यांग बंधू-भगिनी आणि निराधार व्यक्तींना अन्नदान तसेच जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरणार आहे.
बुधवारी केशर हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जामखेड येथील खर्डा रोडवरील नागेश्वर मंदिरासमोरील केशर हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून पुरस्कारार्थींचा सन्मान वाढवावा, असे आवाहन संतोष पवार, केतन पवार, समीक्षा पवार, शेखर पवार तसेच समस्त पवार परिवार व शिंदे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. संजू काकांवर अभिनंदनाचा वर्षाव संजय कोठारी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल धनंजय भोसले, युवा उद्योजक प्रफुल्ल सोळंकी, राहुल राखेचा, मिठूलाल नवलाखा, साखर सम्राट अशोक चोरडिया, राजेश मोरे, रोहिदास केकान, गणेश देवकाते, योगेश पवार यांच्या सह अनेक मान्यवर पत्रकार यांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाजातील दुःखितांच्या मदतीला धावून जाणारे हात, गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे कार्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार यांचा सन्मान म्हणजेच संजू काकांना मिळालेला ‘समाजभूषण’ पुरस्कार होय. त्यांच्या या सन्मानामुळे जामखेडच्या सामाजिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.