कापसाच्या शेतात कापसाच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार गुरवपिंप्री (ता. कर्जत) येथे उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मिरजगाव पोलिसांनी शेतावर छापा टाकत तब्बल ६३ किलो ६५५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत ३१ लाख ८२ हजार ७५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी तात्याराम भिकाजी गावडे (रा. गावडेवाडी, गुरवपिंप्री, ता. कर्जत) याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीने गांजाच्या शेतीचा पर्दाफाश! अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विजय झंजाड व पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुरवपिंप्री येथील एका व्यक्तीने आपल्या शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पडताळणी केली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कर्जत व मिरजगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला.
कापसाच्या पिकाआड गांजाची लागवड! गुरवपिंप्री येथील गावडेवाडी परिसरात तात्याराम भिकाजी गावडे याच्या राहत्या घराशेजारील कापसाच्या शेतात पोलिसांना गांजाची झाडे आढळून आली. कापसाच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शेताची तपासणी केली. या कारवाईत गांजाची झाडे जप्त करून त्यांचे वजन करण्यात आले. त्यामध्ये एकूण ६३ किलो ६५५ ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत तब्बल ३१ लाख ८२ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून संबंधित आरोपीला अटक केली.
३१ लाखांच्या गांजा जप्तीने कर्जत तालुक्यात खळबळ! शेतीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कापसाच्या पिकाआड गांजाची लागवड करून हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक कारवाईतून समोर आले आहे. या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच गांजाची विक्री कोणाला केली जाणार होती, यासह इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडाकेबाज कामगिरी! पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे, पोलीस अंमलदार गणेश ठोंबरे, सुनील खैरे, गोकुळ पळसे, अमित बरडे, स्वाती जगधने, चालक राहुल सपट तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कर्जत येथील मनोज लातूरकर व सागर जंगम यांनी ही कारवाई केली.
अंमली पदार्थांची माहिती द्या; नाव गोपनीय ठेवणार! मिरजगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात कोणी अंमली पदार्थांची लागवड, विक्री किंवा साठवणूक करीत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कापसाच्या शेतात गांजाची लागवड आणि तब्बल ३१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याने मिरजगाव पोलिसांच्या या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.