सोलापूर येथे १९ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या इन्स्टॉलेशन सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीने उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी बहुमान पटकावला. उत्कृष्ट सामाजिक कार्य आणि संघटनात्मक कामगिरीच्या जोरावर क्लबला ‘सुपर स्टार क्लब’ सुवर्ण पदक तसेच मेंबरशिप पुरस्काराचे सिल्व्हर सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात २०२६-२७ या वर्षासाठी रो. जयेश पटेल यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध रोटरी क्लबांचा गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण यांना उत्कृष्ट नेतृत्व आणि संघटन कौशल्याची दखल घेत ‘कुशल संघटक’ हा सुवर्ण सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार परमपूज्य १०८ आश्रयकुमार महाराज, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेश पटेल, रो. परुल पटेल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे आणि रो. संगीता लातुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, सचिव अरुण उगले, मार्गदर्शक डॉ. प्रशांत गायकवाड, प्रचार प्रमुख धनराज पवार, कार्यकारी सभासद प्रा. संभाजी मुळे, रो. सुनील उगले, डॉ. भरत देवकर यांच्यासह अनेक रोटरीयन उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या या यशाबद्दल विविध जिल्ह्यांतील रोटरी क्लब, तसेच जामखेड शहर व तालुक्यातील नागरिकांकडून क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
▮ चौकट : समाजोपयोगी उपक्रमांवर भर रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीने गेल्या वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत. बावी येथील जिल्हा परिषद शाळेला पाच संगणक संच भेट, वृक्षारोपण, जामखेड स्मशानभूमीत ‘पसायदान’ फलक उभारणी आदी उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले. तसेच येत्या काळात जामखेड शहरातील शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम संच, बायो फर्टिलायझर ड्रम वाटप आणि व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष रोटरीयन डॉ. सादेख पठाण यांनी दिली.