अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवारांनीही पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारयादीचा आधार घेऊन ग्रामपंचायतींची मतदारयादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यानंतर २४ ते २९ जुलैदरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. प्राप्त हरकतींची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील आणि ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदारयादीचे संपूर्ण काम तहसील कार्यालयांच्या माध्यमातून पार पडणार असून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ८४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. तालुकानिहाय सर्वाधिक ग्रामपंचायती अकोले (१२), जामखेड (४९), राहाता (२५), शेवगाव (४८), संगमनेर (१४), पारनेर (८८),पाथर्डी (७९), श्रीगोंदा (६२) अहिल्यानगर ( ६०) नेवासा (५९ ), कर्जत (५५),राहुरी (४४), कोपरगाव (२९), श्रीरामपूर (२७),आदी तालुक्यांमध्ये आहेत.
इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका रखडल्या होत्या. आता मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गावपातळीवर बैठकांचे आयोजन, मतदार संपर्क आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
मतदारयादीचा कार्यक्रम २४ जुलै – प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध २४ ते २९ जुलै – हरकती व सूचना स्वीकारणे ४ ऑगस्ट – अंतिम मतदारयादी प्रसिद्ध मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.