जामखेड न्युज – – – – –
रस्ते विकासकामांची गुणवत्ता कायम राखत प्रलंबित कामांना गती द्या – सभापती प्रा. राम शिंदे
कर्जत-जामखेड येथील विविध रस्ते प्रकल्पांचा सविस्तर आढावा
रस्ते विकासाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध व विहित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत. प्रलंबित कामांना गती देऊन दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

कर्जत-जामखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, जामखेडच्या नगराध्यक्षा प्राजंल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नगर-जामखेड राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रमुख रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना प्रा. शिंदे यांनी रस्त्यांची गुणवत्ता कायम राखण्यावर भर दिला. दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती संबंधित कंत्राटदारांकडून करून घ्यावी. कामांमध्ये आवश्यक तेथे तांत्रिक तपासणी करून गुणवत्ता अबाधित राखावी. तसेच महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नगर-जामखेड राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्याने कामातील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे महसूल, पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जामखेड-खर्डा रस्त्याच्या रुंदीकरणासह विविध विकासकामांतील स्थानिक अडचणी प्रशासनाच्या समन्वयातून दूर कराव्यात, असे त्यांनी सांगितले. जमीन मोजणी, सीमांकन, भूसंपादन तसेच वीज, सौर ऊर्जा व इतर विभागांशी संबंधित बाबींचा समन्वय साधून विकासकामांना गती द्यावी. नागरिकांची गैरसोय टाळत उपलब्ध जागेचा योग्य वापर करून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.





