‘आखाडा’ आणि ‘हॅटट्रिक’ची चर्चा मात्र शहरातील रखडलेल्या महामार्गाच्या प्रश्नाला बगल
आमदार रोहित पवार व सभापती प्रा राम शिंदे यांचे शाब्दिक फटकेबाजी
जामखेडच्या कुस्ती आखाड्यातून प्रा. राम शिंदेंचा राजकीय इशारा; ‘कोण पडतंय, कोण जिंकतंय हे पाहू’ रोहित पवारांचा हॅटट्रिकचा दावा; ‘पुन्हा एकदा विरोधकाला पाणी पाजणार’ — दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांनी जामखेडचे राजकारण तापले मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या शहरातील महामार्गावर दोन्ही नेत्यांनी बोलणे टाळले अद्याप निवडणूका लांब आहेत पण दोन्ही नेते एकमेकांविरूद्ध राजकीय टिप्पणी करत आहेत मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा रस्ता प्रश्न बाजूला पडला आहे.
जामखेड तालुक्यातील राजकीय वातावरण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सत्कार कार्यक्रमात केलेल्या हॅटट्रिकच्या वक्तव्याला सभापती प्रा. राम शिंदे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून दिलेल्या सूचक प्रत्युत्तरामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवार यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडकरांनी आपल्या पाठीशी उभी केलेल्या ताकदीमुळे राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करता आला, असे सांगितले.
अन्नत्याग उपोषण आणि विविध आंदोलनांमुळे राज्यातील ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, तसेच कांद्याच्या भावासाठी केलेल्या आंदोलनामुळे कांद्याचा भाव ५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करता आला, असा दावा त्यांनी केला.
याच कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी, ‘मी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक करणार, परत एकदा विरोधकाला पाणी पाजणार,’ असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच प्रा. राम शिंदे यांच्या कुस्तीच्या आखाड्यातील वक्तव्याने त्याला नवा राजकीय रंग मिळाला आहे.
आखाड्यातून राजकीय भाष्य जामखेडच्या कुस्ती आखाड्याला पारंपरिक महत्त्व आहे. याच आखाड्यात उपस्थित असताना प्रा. राम शिंदे यांनी कुस्तीच्या डावपेचांची सांगड राजकारणाशी घालत सूचक भाष्य केले. ‘कोण पडतंय, कोण जिंकतंय हे पाहू. आखाडा सोडू नका,’ अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच कुस्तीच्या आखाड्यात कोण जिंकतो आणि कोण पडतो, हे जसे ठरते, तसेच राजकारणातही परिस्थिती बदलत असते, असा संदर्भ त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.
प्रा. राम शिंदे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत समर्थक आणि विरोधकांकडून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
‘आखाडा’ आणि ‘हॅटट्रिक’ची चर्चा एका बाजूला रोहित पवार यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करत हॅटट्रिकचा दावा केला आहे, तर दुसरीकडे प्रा. राम शिंदे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आगामी राजकीय सामना रंगणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुकीची तयारी आणि दोन्ही बाजूंकडून सुरू असलेली वक्तव्ये पाहता या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जामखेडमध्ये ‘आखाड्यातील हा राजकीय डाव नेमका कुणासाठी?’ यावर चर्चा रंगली आहे. समर्थकांकडून प्रा. राम शिंदे यांच्या थेट आणि आक्रमक शैलीचे समर्थन केले जात आहे, तर विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यांवर राजकीय चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता रोहित पवारांच्या हॅटट्रिकच्या दाव्याला प्रा. राम शिंदे यांच्या ‘आखाड्यातून’ मिळालेल्या प्रत्युत्तराची राजकीय लढाई पुढे कोणत्या वळणावर जाते, याकडे कर्जत-जामखेडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.