Friday, September 4, 2026
Home ताज्या बातम्या भाजप, राष्ट्रवादीनंतर पांडूरंग माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

भाजप, राष्ट्रवादीनंतर पांडूरंग माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मुंबईत पक्षप्रवेश; जनसेवा अधिक ताकदीने करण्याचा निर्धार

0
77

जामखेड न्युज – – – – 

भाजप, राष्ट्रवादीनंतर पांडूरंग माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मुंबईत पक्षप्रवेश; जनसेवा अधिक ताकदीने करण्याचा निर्धार

 

जामखेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते पांडूरंग माने यांनी शिवसेना पक्षात अधिकृत व जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या अधिकृत निवासस्थानी त्यांच्या शुभहस्ते हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

पांडूरंग माने यांनी यापूर्वी भाजप किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव म्हणून सुमारे सव्वा वर्ष कार्य केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये व्हीजेएनटी (VJNT) विभाग प्रमुख म्हणून दीड वर्ष जबाबदारी सांभाळली. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पक्षप्रवेशानंतर पांडूरंग माने म्हणाले, “भक्ती आणि शक्तीच्या अधिष्ठानाने प्रेरित होऊन जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पांडूरंग माने यांनी शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या सोहळ्याला शिवसेना युवा नेते आकाश बाफना, शिवसेना जामखेड तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पांडूरंग माने यांनी आपल्या राजकीय व सामाजिक प्रवासात मोलाची साथ देणारे हितचिंतक, वडीलधारी मंडळी, मित्रपरिवार, सहकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव यांचे विशेष आभार व्यक्त केले. सर्वांच्या विश्वासाच्या बळावर जनसेवा आणि विकासाची वाटचाल अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पांडूरंग माने यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जामखेड तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक कामाला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!