जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग जामखेडमध्ये! शुक्रवारी संपूर्ण तालुका बंद, मराठा समाजाचा शासनाला इशारा
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असताना जामखेड तालुक्यातील अखंड मराठा समाजाने आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड शहरासह संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अखंड मराठा समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने तहसीलदार, जामखेड यांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत समाजामध्ये चिंता निर्माण झाली आहे. शासनाने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन केवळ आश्वासनांवर न थांबता मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका अखंड मराठा समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
शुक्रवारी जामखेड बंद शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारचा जामखेड बंद आयोजित करण्यात आला आहे. या बंदमध्ये शहर व तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेणे, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घेणे, त्यांच्या प्रकृतीचा गांभीर्याने विचार करणे आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
‘आता केवळ आश्वासने नकोत’ “शासनाने आता केवळ आश्वासने न देता मराठा समाजाच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका अखंड मराठा समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने उभा राहणार, असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या जामखेड बंदकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.