“एड्सविरोधात जनजागृतीचा एल्गार!” सनराईज् शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना आरोग्यसंरक्षणाचे धडे
सनराईज् शैक्षणिक संकुल, पाडळी येथे गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांना आजाराबाबत शास्त्रीय व योग्य माहिती मिळावी, तसेच आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
जामखेड तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या सुप्रिया कांबळे मॅडम व नोल सतराळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना एड्सचा प्रसार, कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आजाराबाबत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
एड्सविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेताना स्वच्छता, सुरक्षित आरोग्यविषयक सवयी आणि आवश्यकतेनुसार योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्वही समजून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. यासोबतच विविध आजारांची प्राथमिक लक्षणे ओळखणे, आजाराची लक्षणे जाणवल्यास वेळ न दवडता वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि आरोग्यविषयक माहिती इतरांपर्यंत पोहोचविणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास सनराईज् शैक्षणिक संकुलाच्या संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड मॅडम, तसेच सुषमा भोरे, साधना हौसिंग, सुनील पठाडे, विनोद बहिर, प्रदीप भोंडवे, छबिलाल गावित, दादासाहेब मोहिते, विवेक सातपुते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुनील घाडगे यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली.