जामखेड न्युज——
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकतची बाल वारकरी दिंडी उत्साहात संपन्न

आपले महाराष्ट्र राज्य थोर अशा साधुसंतांची भूमी आहे राज्याला अध्यात्मिक व सामाजिक परंपरेचा समृद्ध वारसा आहे. पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे. यातून सामाजिक समता, ऐक्य आणि बंधुभाव यांची जोपासना होते. तसेच वारीतून दुर्मिळ अशा आनंद प्राप्तीचा अनुभव येतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत च्या शालेय विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी शनिवारी उत्साहात संपन्न झाली.

दिंडीचे गावात ठिक-ठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.दिंडीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगणित झाला. या कामी माता, पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांचे विशेष सहकार्य लाभले.

सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव हीच विचारधारा आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. याच उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या नियोजन आणि संकल्पनेतून येथील प्राथमिक शाळेची बाल वारकरी दिंडी ही नुकतीच विद्यार्थ्यांनी हाती भगव्या पताका फडकवीत, टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-माऊली, तुकाराम आणि पांडुरंगाचे भजन आणि नामघोष करीत दिंडी उत्साहपूर्वक वातावरणात पार पाडली.

या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची सुंदर अशी वेशभूषा केली होती. बालवेशभूषेतील विठ्ठल व रुक्मिणी हे तर सर्वांच्या आकर्षणाचा एक भागच बनला होता. काही विद्यार्थ्यांनाच्या डोक्यावर छोटी-छोटी तुळशी वृंदावने व झाडांची रोपे होती.

यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांसमवेत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.






