एकाग्रता वाढविण्यासाठी अबॅकस उपयुक्त – उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
आर्यभट्ट अबॅकस अकॅडमीत राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा
अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गणितीय क्रिया करण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात केवळ अभ्यास न करता विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळविण्याची जिद्द ठेवावी. भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चिकाटी, जिद्द आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मोबाईलच्या अतिवापरापेक्षा विद्यार्थ्यांनी अबॅकससारख्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांकडे वळणे आवश्यक असल्याचे उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
आर्यभट्ट अबॅकस अँड वैदिक मंथ अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी युग लॉन्स, हॉटेल आष्ठा फाटा, चिंचपूर येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गिते, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय कोठारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, जैन कॉन्फरन्स, दिल्ली तसेच प्रांजलताई चिंतामणी, नगराध्यक्षा जामखेड नगरपरिषद, बाबासाहेब शेकडे, अमितभाऊ चिंतामणी, सुदाम वराट, नंदकुमार ठोंबरे, रविंद्र घुले, सभापती प्रविण सानप, हिना ईस्माईल सय्यद, लक्ष्मण गर्जे, अशोक वामन, मनोज दळवी, राजेंद्र देशपांडे, डॉ. युवराज खराडे, अप्पा शिरसाठ, डॉ. पल्लवी सूर्यवंशी, साक्षी काळदाते, दीपाली तवटे, धनश्री उगले, स्वाती कुरमुडे, अमृता रसाळ, युवराज रोकडे, सोपान उत्तम बडे, थोरवे साहेब, वृषाली बोराटे, अॅड. जायभाय, लियाकत शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छोट्या चिमुकल्यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांसमोर अबॅकसचे प्रात्यक्षिक (डेमो) सादर केले. अत्यंत वेगाने गणितीय क्रिया सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
आर्यभट्ट अबॅकस अकॅडमी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये सौ मीरा आंधळे यांना टू स्टार टीचर पुरस्कार आणि सौ प्रगती नागरगोजे व सौ. अलका खताळ यांना स्टार टीचर पुरस्कार तसेच इतर 7 टीचर्स ना बेस्ट टीचर अवॉर्ड देण्यात आला. तसेच निती निखिल थोरात 5 मिनिटांत (260गुण), श्रावणी शिवाजी राख (255 गुण)शिव बाळासाहेब बोराडे ( 199 गुण), प्रांजल लहू राख (191गुण), अनुष्का विजय वायबसे (179 गुण)मिळवून चॅम्पियन ची ट्रॉफी मिळवली.
अभिमान व कर्तृत्वाचा दिवस – प्रांजलताई चिंतामणी
प्रांजलताई चिंतामणी यांनी हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अभिमान आणि कर्तृत्वाचा दिवस असल्याचे सांगितले. गणित विषयात सरावाला मोठे महत्त्व असून दैनंदिन जीवनातही गणितीय क्रियांचा उपयोग होत असतो. अबॅकस स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तालुक्याचे नाव लौकिक वाढविले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिद्द, चिकाटी आणि सातत्य आवश्यक – पै. शरद कार्ले
सभापती पै. शरद कार्ले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जीवनात यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. दादासाहेब गिते यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपल्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धा परीक्षांसाठी अबॅकसचा फायदा – संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना अबॅकसच्या सरावाचा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच फायदा होईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी लहान वयातच अभ्यासाची सवय, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करावा, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले.