श्री साकेश्वर विद्यालयाचा तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक; गुणवंत खेळाडूंचा प्रमाणपत्र, पदक व ट्रॉफी देऊन सत्कार
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचा गौरव सोहळा सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित स्पर्धा दि. २५ मे २०२६ रोजी पार पडली होती. स्पर्धेतील सर्व सामने दमदार खेळत श्री साकेश्वर विद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित पालक व शिक्षकांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, शिस्त, परिश्रम आणि सांघिक खेळाची भावना याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. या यशामागे ओशन क्रिकेट अकॅडमी, साकतचे प्रशिक्षक डॉ. सुशिल तांबे यांचे मार्गदर्शन लाभल्याने विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंमध्ये साई घोडेस्वार, शंभूराज भोरे, शिवराज लहाने, यशराज सानप, गौरव बहिर, मुरूमकर आणि कार्तिक पगारे यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू डॉ. सुशिल तांबे सर यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी, साकतचे विद्यार्थी आहेत.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, अर्जुन रासकर, सुलभा लवुळ, मुकुंद वराट, सचिन वराट, प्रसाद होशिंग, ज्योती लहाने, सागर पवार, अतुल दळवी तसेच ओशन क्रिकेट अकॅडमी, साकतचे प्रशिक्षक डॉ. सुशिल तांबे, महादेव वराट उपस्थित होते. याशिवाय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक डॉ. सुशिल तांबे आणि विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.