Home शैक्षणिक बातम्या जामखेड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ...

जामखेड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ‘टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा’ – डॉ. जी. डी. केळकर

0
5

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

‘टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा’ – डॉ. जी. डी. केळकर

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित जामखेड महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि लोकजागृतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव अरुणकाका चिंतामणी व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाय. एस. नरके, कला शाखाप्रमुख प्रा. ए. बी. फलके, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. एस. एन. गाडेकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. गोलेकर, परीक्षा विभागप्रमुख डॉ. ए. एच. कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रमुख वक्ते डॉ. जी. एम. जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा ऐतिहासिक आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या घोषणेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. शिक्षण, पत्रकारिता, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून टिळकांनी समाजजागृतीचे महान कार्य उभारले. आजच्या तरुणांनी राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा स्वीकार करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.


यानंतर डॉ. जी. मस्के यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यावर सखोल विवेचन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यकृती आणि लोकशाहिरीतून शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडत समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक जाण असलेले, संवेदनशील आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून राष्ट्रनिर्माण, समाजसेवा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी टिळकांचे राष्ट्रप्रेम आणि अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आत्मसात करून लोकशाही मूल्यांची जपणूक करावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. ए. भाकरे यांनी केले, तर प्रा. पी. बी. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!