जामखेड न्युज——
विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपकडून राम शिंदे यांचे नाव आघाडीवर
अडीच वर्षांपासून रिक्त विधानपरिषद सभापतिपदासाठी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यामुळे येत्या गुरुवारी सभापती निवड होऊ शकते. आमदार प्रा राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचा सभापती निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सत्ता कायम राहील की नाही याबद्दल साशंकता असल्यानं भाजपनं विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. सध्या तरी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे आताच आपला सभापती बसवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे, प्रविण दरेकर आणि निरंजन डावखरेंची नावं आघाडीवर आहेत. येत्या आठवड्यात गुरूवारी विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते. सत्तेत असलेल्या घटक पक्षांपैकी कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही. राम शिंदे पुढील सभापती असू शकतात. अशी दाट शक्यता आहे.
त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असून राज्यात सत्ताबदल झाला तरी विधानपरिषदेत आपले वर्चस्व कायम रहावे यादृष्टीने सभापतिपदाची निवडणूक घेण्याची रणनीती महायुती सरकारने आखली आहे.
महायुतीकडे परिषदेत सर्वाधिक ३१ चे संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे २० चे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपकडून उमेदवार दिला जाईल.
राम शिंदे, प्रवीण दरेकर व निरंजन डावखरे ही नावे चर्चेत आहेत. धनगर समाजाचे असलेले राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत धनगर मतांची बेगमी करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. शिंदे हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. २०१९ मध्ये रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली.
परिषदेतील महायुती
भाजप १९, अजित पवार गट ६, शिंदेसेना ३,रासप १,अपक्ष२, एकूण ३१
महाविकास आघाडी
काँग्रेस ८, उद्धवसेना ७, शरद पवार गट २, शेकाप १, अपक्ष २, एकूण २०
…म्हणून लांबली निवडणूक
सभापती रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत ८ जुलै २०२२ रोजी संपली. त्यानंतर राजकीय फुटीने या पदाची निवडणूक झाली नाही.