मशालींच्या ज्वाळांनी अन् हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळला ऐतिहासिक खर्डा किल्ला!
शिवमय वातावरणात १३ वा ‘हिंदवी स्वराज्य दीपोत्सव’ दिमाखात, मशालफेरी, भगवी रोषणाई अन् करपल्लवीने शिवप्रेमी भारावले!
ऐतिहासिक वैभवाचा साक्षीदार असलेला खर्ड्याचा भुईकोट किल्ला मशालींच्या तेजाने आणि शेकडो दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला. शिवरायांच्या जयघोषाने अवघा किल्ला शिवमय झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (खर्डा विभाग) व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला १३ वा ‘हिंदवी स्वराज्य दीपोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन भाजपा शहरमंडलाध्यक्ष तथा नगरसेवक संजयकाका काशिद, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, बाळासाहेब दिंडोरे, अशोक जोरे पाटील व जामखेड नगरपरिषदेचे भाजपा गटनेते तात्यासाहेब पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणामंत्र आणि शिवरायांच्या जयघोषाने सोहळ्याला सुरुवात झाली.
मशालफेरीने किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव उजळले! प्रतिमापूजनानंतर धारकऱ्यांनी हातात पेटत्या मशाली घेऊन किल्ल्याच्या तटबंदीवर भव्य मशालफेरी काढली. तटबंदीवर शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. भगवी रोषणाई, विद्युत सजावट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने किल्ल्याचे दृश्य अत्यंत नेत्रदीपक झाले. या सोहळ्याने उपस्थित शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
मशालफेरीनंतर संबळाच्या कडकडाटात शिवकालीन सांकेतिक भाषा असलेल्या ‘करपल्लवी’चे सादरीकरण करण्यात आले. शिवव्याख्याते गजानन वाव्हळ यांनी खर्डा किल्ल्याचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगत या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले.
खर्डा किल्ला हा परिसराचा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. किल्ल्याचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात खर्डेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खर्डा विभागप्रमुख धारकरी बबलू निकम यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.‘शिवरायांचे आठवावे रूप’ या ध्येयमंत्राने आणि महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली.
शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती या सोहळ्यास केशवराज कोल्हे, घनश्याम भोसले, कमलेश वैद्य, प्रमोद निकम, संकेत काळे, गणेश गोलेकर, ओंकार सातारकर, रविंद्र कुसेकर, सागर शहा, ॲड. पप्पू थोरात, प्रशांत गुरसाळी, वल्लभ हिंगे, रोहित भंडारी, विशाल धोत्रे, आकाश खेडकर, तेजस चावणे, ईश्वर थोरात, ओंकार इंगळे, समर्थ वैद्य, भाऊ भोसले, ज्ञानेश्वर काळे, हर्षद निकम, बंटी शिंदे, शशिकांत गुरसाळी, रेवन पिंगळे, आप्पासाहेब माने यांच्यासह भूम परिसरातील मान्यवर, पत्रकार संतोष थोरात, श्वेताताई गायकवाड, अनिल धोत्रे आणि शेकडो शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.