जामखेड न्युज – – – – –
जिल्हा बँकेत विखे-थोरातांचे ऐतिहासिक समीकरण पुन्हा जुळले! ५८ वर्षांपूर्वीच्या राजकीय जोडीची पुनरावृत्ती!
अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे, उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख, सहकाराच्या व्यासपीठावर दोन घराण्यांचे नवे राजकीय समीकरण!
जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे १९६८ मध्ये विठ्ठलराव विखे पाटील आणि भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आकाराला आलेल्या राजकीय समीकरणाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

विशेष म्हणजे, डॉ. सुजय विखे हे विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू, तर रणजितसिंह देशमुख हे थोरात कुटुंबाचे जावई आहेत. त्यामुळे दोन ऐतिहासिक सहकार घराण्यांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या सत्तेत एकत्र आले आहेत.

जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष मोतीलालजी कुंदनमलजी फिरोदिया यांनी १९५८ ते १९६३ या काळात बँकेची धुरा सांभाळली. त्यानंतर भाऊसाहेब थोरात आणि विठ्ठलराव विखे पाटील यांनी अनेक वर्षे बँकेच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावली. १९६८ ते १९७० या काळात विखे अध्यक्ष, तर थोरात उपाध्यक्ष होते. पुढे दोन्ही नेत्यांनी अध्यक्षपदही भूषविले.

विशेष म्हणजे, विखे आणि थोरात कुटुंबांमध्ये राजकीय संघर्षाची परंपरा राहिली असली, तरी सहकाराच्या व्यासपीठावर दोन्ही घराणी अनेकदा एकत्र आल्याचे चित्र दिसले आहे. यंदाच्या निवडीतही त्याची पुनरावृत्ती झाली. थोरात गटाकडे संचालकांचे संख्याबळ असतानाही अध्यक्षपदासाठी सुजय विखे यांच्या नावावर एकमत झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.





