सर्व अतिक्रमणांवर समान निकषांनी कारवाई करा, रखडलेले महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची निवेदनातून मागणी.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, वाढती वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईतील कथित दुजाभाव यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सर्व अतिक्रमणे अधिकृत हद्दीच्या खुणांनुसार समान निकष लावून हटवावीत आणि रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. याचा सर्वाधिक फटका व्यापारी, वाहनचालक, पादचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विशेषतः खर्डा चौक ते बीड कॉर्नर या वर्दळीच्या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपूर्ण रस्त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
छोट्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई, मग पुढील भागात मोकळीक का? अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत प्रशासनाकडून वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा गंभीर आरोप अवधूत पवार यांनी केला आहे. शासकीय दूध डेअरीपासून समर्थ हॉस्पिटलपर्यंत अतिक्रमणे हटविताना सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना दुकानातील साहित्य काढण्यासाठीही पुरेसा वेळ देण्यात आला नाही. मात्र, समर्थ हॉस्पिटलपासून पुढे कारवाई करताना प्रशासनाची भूमिका मवाळ झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
एकाच राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण हटविण्यासाठी वेगवेगळे नियम कसे असू शकतात? सर्वसामान्यांवर कठोर कारवाई आणि इतर ठिकाणी वेगळी भूमिका, हा दुजाभाव थांबला पाहिजे. महामार्गाच्या अधिकृत गटाच्या हद्दीच्या खुणांनुसार कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्वत्र समान निकषांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दूध डेअरी ते बीड कॉर्नर, खर्डा चौक ते पंचदेवालयापर्यंत कारवाई करा! शासकीय दूध डेअरीपासून समर्थ हॉस्पिटलपर्यंत, समर्थ हॉस्पिटलपासून बीड कॉर्नरपर्यंत तसेच खर्डा चौक ते पंचदेवालयापर्यंत संपूर्ण महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून नियमानुसार अतिक्रमणे हटविण्यात यावीत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, महसूल विभाग, नगरपरिषद आणि संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ठेकेदाराला मुदत द्या; रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करा! महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला निश्चित कालमर्यादा द्यावी. रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करावी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्था करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलने झाली, उपोषणे झाली; तरीही जामखेडकरांच्या पदरी आश्वासनच! राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर यापूर्वीही लोकशाही मार्गाने आंदोलने आणि उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीही काम मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.
“आमची मागणी कोणावरही अन्याय करण्याची नाही, तर सर्वांवर समान न्यायाने आणि अधिकृत गटाच्या हद्दीच्या खुणांनुसार नियमांची अंमलबजावणी करण्याची आहे. जामखेडकरांना आता केवळ आश्वासन नको, तर अतिक्रमणमुक्त महामार्ग आणि प्रत्यक्ष विकासकाम हवे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी,” अशी मागणी अवधूत पवार यांनी केली आहे.
आता जिल्हाधिकारी या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेतात आणि महामार्गावरील अतिक्रमणांवर खरोखरच समान निकषांनी कारवाई होते का, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.