जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन व पेंडल चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपी राम अर्जुन मुरकुटे (वय ३१, रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २ लाख ४० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जामखेड पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. दि. ३१ मे २०२६ रोजी फिर्यादी नवनाथ विष्णू पडळकर (वय ५१, रा. तांबेनगर, बारामती, जि. पुणे) हे कार्यक्रमासाठी चौंडी, ता. जामखेड येथे आले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व त्यामधील पेंडल चोरून नेले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अमोल आजबे यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले.
तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना ९ सप्टेंबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली. चौंडी येथील चैन स्नॅचिंगचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम अर्जुन मुरकुटे याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता राम मुरकुटे याने हा गुन्हा सोमीनाथ कैलास कुसळकर व लखन अर्जुन मुरकुटे, दोघेही रा. मुर्शदपूर, ता. आष्टी, जि. बीड, यांच्या साथीने केल्याची माहिती दिली. या दोन्ही आरोपींचा सध्या शोध सुरू असून ते फरार आहेत. दरम्यान, चोरीचा मुद्देमाल आरोपींनी आपसात वाटून घेतल्याचे तपासात समोर आले. राम मुरकुटे व लखन मुरकुटे यांच्या वाट्याला आलेले सोने बीड येथील एका सोनाराला विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित सोनाराला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यानंतर पंचांसमक्ष त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
ताब्यातील आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. राम अर्जुन मुरकुटे हा यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात नोंद असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८६/२०१७, भादंवि कलम ३९३, ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अमोल आजबे यांच्या पथकाने केली.