Tuesday, August 11, 2026
Home क्राईम न्यूज जामखेडमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ₹५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक...

जामखेडमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ₹५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
2
जामखेडमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ₹५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले,  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जामखेड न्युज – – – – 

जामखेडमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ₹५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले,

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत जतोनेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी महादेव मल्हारी ढाकणे (वय ५२ वर्षे) यांना ₹५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुरुष, वय ५२ वर्षे, यांनी ग्रामपंचायत जातेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

तक्रारदाराने ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, ग्रामपंचायतीशी संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ₹१० हजारांची लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाने सापळा रचला.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड येथील हॉटेल महाभगवती परिसरात लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांना पकडले.

या कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून ₹५ हजारांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित रकमेबाबतही संभाषण झाल्याचे एसीबीच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई सविता तांबे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अजित त्रिपुटे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहिल्यानगर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोना/७० चंद्रकांत काळे, पोको/२२६२ शेखर वाघ व चालक पोलीस हवालदार करांडे यांचा सहभाग होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्याबाबत तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!