गावबंद, महिलांचा कॅंडल मार्च अन् रास्तारोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नान्नज गावातील विविध प्रलंबित मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी ७ ऑगस्टपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मंगळवारी पाचव्या दिवशी मागे घेतले. या आंदोलनाला नान्नज ग्रामस्थ, व्यापारी, महिला, विद्यार्थी तसेच विविध पक्ष-संघटनांनी मोठा पाठिंबा दिला. गावबंद, महिलांचा कॅंडल मार्च आणि रास्तारोकोमुळे नान्नजच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. नान्नज येथे सुसज्ज बसस्थानक उभारावे, बसस्थानकात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व नागरिकांसाठी आसनव्यवस्था करावी, राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी, गावातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, बंधाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, तसेच सुरत-चेन्नई महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी राजेभोसले यांनी उपोषण सुरू केले होते.
३५० मुलींच्या ये-जा करणाऱ्या गावाला सुसज्ज बसस्थानकाची गरज नान्नज व परिसरातील सुमारे ३५० मुली शिक्षणासाठी दररोज शाळेत ये-जा करतात. त्यामुळे गावात सुरक्षित व सुसज्ज बसस्थानकाची सुविधा असणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सध्याच्या बसस्थानकातील अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
गावबंदला उत्स्फूर्त प्रतिसाद उपोषणाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा पाहता ९ ऑगस्ट रोजी नान्नज येथे गावबंद पुकारण्यात आला. व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी महिलांच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महिला तसेच शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
रास्तारोकोने प्रशासनाचे लक्ष वेधले मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी नान्नज येथील जामखेड-कर्माळा मार्गावर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत गावातील मूलभूत प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. रास्तारोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या वतीने मंडलाधिकारी सुवर्णा इकडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शहाजी राजेभोसले यांच्याशी चर्चा केली. विविध मागण्यांबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर राजेभोसले यांनी पाचव्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
प्रशासनाने रस्त्यांची कामे दोन महिन्यांत करण्याचे तसेच बंधारे आणि बसस्थानकाच्या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. ‘हा विजय माझा नसून ग्रामस्थांचा’ उपोषण मागे घेतल्यानंतर शहाजी राजेभोसले म्हणाले, “हा विजय माझा नसून नान्नजमधील व्यापारी, ग्रामस्थ, नागरिक, महिला आणि मित्रपरिवाराचा आहे. सर्वांनी आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला. पत्रकारांनीही सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनांची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. गट-तट बाजूला ठेवून नान्नजचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढेही लढा सुरूच ठेवणार.”
विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा या आंदोलनाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, काँग्रेसचे नेते राहुल उगले, उबाठा गटाचे शिवसेना शहराध्यक्ष भरत मोहळकर, भुजंग दळवी, माजी चेअरमन इन्नुसभाई पठाण, अंकुश मोहळकर, अजय राजपूत, पोपट क्षीरसागर, अस्लम शेख, नितीन पाद्रे, नागनाथ मोहळकर, अमर चाऊस, सतीश साळवे, राखा गोरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
पाच दिवसांच्या आंदोलनानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता झाली असली तरी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे आता नान्नज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आंदोलनामुळे नान्नजच्या मूलभूत प्रश्नांना व्यापक स्वरूपात वाचा फुटली असून, प्रशासनासमोर आता आश्वासनपूर्तीचे आव्हान आहे.