माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ बाफना यांनी सुरू केलेली पायी दिंडीची तीस वर्षांची भक्तिमय परंपरा यापुढेही अखंड सुरू ठेवणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा आणि धार्मिक परंपरेचे जतन करणे हाच बाफना परिवाराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशीनिमित्त बाफना परिवाराच्या वतीने व भजनी मंडळाच्या सहकार्याने शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ तसेच बाफना यांच्या निवासस्थानापासून दिंडीला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ बाफना यांनी तीन दशकांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे चिरंजीव आकाश बाफना पुढे चालवत आहेत. यंदाही मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-कीर्तन आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पांडुरंग हरी’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
यावेळी ह.भ.प. पंढरीनाथ राजगुरू महाराज, ह.भ.प. नारायण दौंड महाराज, ह.भ.प. महारुद्र नागरगोजे महाराज, ह.भ.प. बाळासाहेब गाडे महाराज, ह.भ.प. ईश्वरी नागरगोजे महाराज, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बेलेकर, अशोक शिंगवी, अशोक बाफना, महावीर बाफना, पिंटूशेठ बोरा, रवींद्र छाजेड, गौतम (दादा) बाफना, रोशन बाफना, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, हरिदास गुंड, संतोष बारगजे, संतोष राळेभात, सोपान जाधव, सुनील शिंदे, दत्ता म्हेत्रे, दत्तात्रय जगताप, विकी पिंपळे, अशोक कुमटकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित होते.
तीन दशकांपासून सुरू असलेली ही दिंडी परंपरा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम ठरत आहे.