जामखेडमध्ये अवैध दारू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अरणगाव येथे अवैध देशी/विदेशी दारुची विक्री करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत आरोपीकडुन ४२,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार पोनि / श्री. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार संतोष साबळे, शामसुंदर जाधव यांचे पथक तयार करुन सदरपथकास जामखेड तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन रवाना करण्यात आले.
पथकाने दिनांक ०५/०५/२०२६ रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमी दारमार्फत इसम नामे रविकांत दत्तात्रय भोगे हा अरणगाव शिवारात असलेल्या साई हॉटेलमध्ये अवैध देशी/विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहिती नुसार हॉटेल साई येथे जावुन छापा टाकुन इसम नामे रवीकांत दत्तात्रय भोगे वय – ४१ वर्षे रा. अरणगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन देशी/विदेशी दारु असा एकुण ४२,५००/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.