दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी मोठा दिलासा!
जामखेड तालुक्यात १५०० किलो ज्वारी बियाणे १०० टक्के अनुदानावर वाटप, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य!
तालुक्यातील टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग, जामखेड यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत वैरण विकास बियाणे वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या १५०० किलो ज्वारी बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हे बियाणे पात्र शेतकरी व पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था आणि पाणी उपलब्ध असलेल्या शेतकरी व पशुपालकांना रब्बी हंगामात चारा पिकाची लागवड करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी आपल्या गावाचा समावेश ज्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात होतो, त्या ठिकाणच्या पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बियाणे मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे १. विहित नमुन्यातील अर्ज २. ओळखपत्र ३. शेतजमिनीचा ७/१२ उतारा ४. अपंगत्व असल्यास अपंग प्रमाणपत्र ५. रेशन कार्ड ६. अपत्य दाखला (स्वघोषणापत्र) ७. सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे किंवा नाही, याबाबत कृषी विभागाचा अभिप्राय ८. हमीपत्र सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी व पशुपालकांकडे सिंचनाची व्यवस्था असणे आणि रब्बी हंगामात चारा पिकासाठी पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून अर्ज करावा. १५०० किलो ज्वारी बियाणे उपलब्ध असून बियाण्याचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
त्यामुळे पात्र शेतकरी व पशुपालकांनी वेळ न दवडता या १०० टक्के अनुदानाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जामखेड यांच्या वतीने पशुवैद्यकीय अधिक्षक डॉ मोटेगावकर यांनी केले आहे