२१ पैकी १८ जागांवर वर्चस्व, तरी अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम!
जिल्हा बँकेची चावी फडणवीसांच्या हाती, विखे-थोरात गटात अध्यक्षपदासाठी चर्चा!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने २१ पैकी तब्बल १८ जागांवर संचालक निवडून आणत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, एवढे मोठे संख्याबळ मिळूनही बँकेचा अध्यक्ष कोण होणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
११ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १० जागांसाठी झालेल्या मतदानात या पॅनलने ७ जागा जिंकल्या. थोरात गटाचे १२, तर विखे गटाचे ६ संचालक असल्याचे सांगितले जात आहे. संजीवनी शिंदे-गायकर यांच्या पाठिंब्यामुळे सत्तेचे संख्याबळ १८ वर पोहोचले आहे.
या निवडणुकीत पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांनी विखे समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव केला, तर अकोल्यात आमदार किरण लहामटे यांना संजीवनी शिंदे यांनी पराभूत केले. राम शिंदे गटाला दोन, तर लंके गटाला एक जागा मिळाली.
अध्यक्षपदासाठी पाच नावे चर्चेत! बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमदार मोनिका राजळे, डॉ. सुजय विखे पाटील, बिपीन कोल्हे, आमदार आशुतोष काळे आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, मोनिका राजळे यांच्या नावाला संधी मिळाल्यास बँकेच्या ६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विखे-थोरात गटातील चर्चांसह मुख्यमंत्री कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जामखेडचा संचालक बिनविरोध! जामखेडमधून सुधीर घुमरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात जामखेडचे प्रतिनिधित्वही महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे १८ संचालकांचे संख्याबळ, तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे; अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचा नवा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचे उत्तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.