अहिल्यानगरसाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद ठरला. निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, ‘हेरिटेज वॉक’चे प्रणेते आणि स्नेहालयच्या ९०.४ एफएम ‘रेडिओ नगर’चे माजी संचालक श्री. भूषण गोपाळ देशमुख यांचे आज, शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी निधन झाले.
नगरच्या वैभवाचे साक्षीदार हरपले भूषण देशमुख हे केवळ नाव नव्हते, तर अहिल्यानगरचा जिवंत इतिहास होते. कोट बाग निजामपासून भुईकोट किल्ल्यापर्यंत, चांदबिबीपासून ते मलिक अहमदपर्यंत नगरचा प्रत्येक दगड, प्रत्येक बुरूज त्यांना तोंडपाठ होता.
जामखेडशी नाते
जामखेड मध्ये त्यांचे नातेवाईक आहेत ते नेहमी जामखेड ला येत असत त्यांचे शिक्षण जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयात झाले होते ते १९७९ साली ते दहावी मध्ये तालुक्यात प्रथम आले होते.
काही दिवसांपुर्वी सैन्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यास नगर भुईकोट किल्ला दाखवून माहिती सांगत असताना अचानक सर्प दंश झाला सायंकाळी घरी आल्यावर त्रास सुरू झाला यानंतर दवाखान्यात दाखल केले काही दिवस दवाखान्यात उपचार घेऊन घरी सोडले होते पण पुन्हा त्रास सुरू झाला तेंव्हा पुन्हा दवाखान्यात दाखल केले दोन दिवस ते व्हेन्टिलेटर वर होते शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे अमूल्य योगदान 1. हेरिटेज वॉक – नगरच्या गल्लोगल्ली इतिहास घेऊन फिरणारी त्यांची ‘हेरिटेज वॉक’ ही चळवळ हजारो नागरिकांना, विद्यार्थ्यांना व संशोधकांना नगरच्या वैभवाशी जोडणारी ठरली.
2. रेडिओ नगर ९०.४ एफएम – संचालक म्हणून त्यांनी रेडिओच्या माध्यमातून नगरचा इतिहास घराघरात पोहोचवला.
3. पत्रकारिता व लेखन – निजामशाही, मराठा कालखंड व ब्रिटिश राजवटीचा अभ्यासपूर्ण इतिहास त्यांनी लेखणीतून मांडला. 28 मे 2026 रोजीचा त्यांचा ‘नगरचा अभेद्य भुईकोट’ हा लेख त्यांच्या अखंड कार्याचा पुरावा आहे.
4. संशोधन व मार्गदर्शन – नव्या पिढीला संदर्भासह इतिहास सांगणारे, पुराव्यानिशी बोलणारे ते खरे गुरु होते.
न भरून येणारी पोकळी नगरचा इतिहास विचारायचा तर ‘भूषण सरांना विचारा’ हे समीकरण होते. त्यांच्या जाण्याने नगरच्या इतिहासातील *एक अमूल्य दस्तऐवज, एक संदर्भग्रंथ हरपला* आहे. नगरच्या वारसा जतनाच्या चळवळीचे ते आधारस्तंभ होते.
त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, शहराने इतिहासाचा एक चालता-बोलता ज्ञानकोश गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेडिओ नगर, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर येथे ठेवण्यात येणार आहे.
अंत्यविधी आज सायंकाळी ६.०० वाजता अमरधाम, अहिल्यानगर येथे होणार आहे. नगरचा इतिहास जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत भूषण देशमुख यांचे नाव अजरामर राहील