वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई, शहराला १५ दिवसांनी पाणी, जनावरांच्या चारा-पाण्याचाही गंभीर प्रश्न!
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जामखेड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत निम्माच पाऊस झाल्याने नदी, नाले, विहिरी आणि तलावांची पाणीपातळी खालावली आहे. जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलावही आटत चालल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. अनेक लोक सांगतात सत्तर वर्षात अशी परिस्थिती कधीच नव्हती १९७२ च्या दुष्काळात पाणी होते चारा नव्हता आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांची तहान सध्या टँकरवर अवलंबून आहे. शहराला १५ दिवसांतून एकदा पाणी मिळत असून नगरपरिषदेने ३० टँकरची मागणी केली आहे. ग्रामीण भागासह शहरात टॅकरची मागणी वाढत चालली आहे. जामखेड तालुक्यात तालुक्याला पाणीपुरवठा करता येईल असा कोठेही पाण्याचा उद्भव नाही.
दुष्काळामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. शेतात चारा नसल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. जनावरांच्या संगोपनाचा खर्च परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. अद्याप चारा छावण्या सुरू नसल्याने पशुपालकांमध्ये नाराजी आहे.
दुसरीकडे हाताला काम नाही, शेतीत उत्पन्न नाही आणि बाजारपेठेतही मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी जामखेडकरांसाठी आनंदाऐवजी चिंतेची ठरत आहे.
पुढील आठ ते नऊ महिने पाणीटंचाईचे संकट कायम राहण्याची शक्यता असल्याने टँकरची संख्या वाढविणे, चारा छावण्या सुरू करणे आणि दुष्काळी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी होत आहे.
दिवाळीचे दिवे उजळले, पण दुष्काळाने जामखेडकरांच्या आयुष्यात अंधार केला; आता शासन मदतीचा हात कधी देणार?