जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुका महसूल, ग्रामरोजगार, रोजगार हमी योजनेचे कामे, पोलीसांच्या बाबतीत राज्यात पुढे आहे. मी व्यक्तीगत कामासाठी नाही तर जनतेच्या असलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी अधिका-यावर दबाव टाकतो. यापूर्वीचा आमदार वर्षानुवर्षे विचारत नव्हता ती वेगळी गोष्ट आहे. लोकांच्या हितासाठी काम करण्यास मी कधीच संतुष्ट नसतो असे मत आमदार रोहीत पवार यांनी केले.
येथील जगदंबा लॉन्स येथे “आमदार आपल्या दारी ” हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. पवार बोलत होते. जामखेड शहर व तालुक्यातून जवळपास ४५० तक्रारी नागरिकांनी विविध खात्यासंदर्भात केल्या होत्या. सर्वात जास्त तक्रारी महावितरण कंपनीच्याबाबत होत्या.
यावेळी कर्जत उपविभागीय अधिकारी डॉ. विजय थोरबोले, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आदी अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व गावचे सरपंच व तक्रारदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले या ठिकाणी आपले व्यक्तीगत प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक आले आहेत. त्यांनी लेखी दिलेली तक्रार मी संबंधीत अधिकारी यांना देतो. यातील काही तक्रारी जाग्यावर सुटतात. त्याची एक प्रत अधिकारी व एक माझ्याकडे असते. काही तक्रार सोडवण्यासाठी मी अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेऊन सोडवतो. सर्वांचे समाधान होते असे नाही. काही तक्रारी नियमाच्या बाहेर असतात अशावेळी कोणावर अन्याय होणार नाही यादृष्टीने पाहीले जाते.
तालुक्यात अधिकारी काम करत असताना तुम्हाला वाटत असेल अधिकारी चुकतो व माझ्या निदर्शनास आले तर त्यांना मी सोडणार नाही. अधिकारी चांगले काम करत असेल तर त्यांना समजून घ्या. यापूर्वी महीला पोलीस स्टेशनला येत नव्हत्या. गरीब माणूस तर येतच नव्हता अनेक लोक ब्लॅकमेल करीत होते. आता महिला व गरीब लोक येऊन तक्रार दाखल करतात. खोटे गुन्हे दाखल होत नाही जे थोडेफार होतात ते बंद होईल असे आ. पवार म्हणाले.
यावेळी ४५० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील काही जाग्यावर तर काही तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अधिकारी यांनी नोट्स करून तक्रारीबाबत अभिप्राय आ. पवार यांना दिला.