जामखेड न्युज – – –
बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील पेशाने शेतकरी असलेल्या त्यातही जेमतेम शेती त्यात कर्जाचा डोंगर त्यामुळे लग्न जुळवण्यासाठी अडचणी येत आहेत अशाच त्रासाला कंटाळून तरूण मुलाने स्वतःच सरण रचून त्यात उडी घेत आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महेंद्र नामदेव बेलसरे (30 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने चक्क स्वतःचंच सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला देत नसल्यानं शेतकरी तरुणांना होणारा त्रास पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या छोट्याशा गावात बुधवारी दोन ठिकाणी लग्न समारंभ होते. महेंद्र बेलसरे हा युवकही या लग्नांमध्ये सामील झाला होता. परंतु सायंकाळी अचानक महेंद्र एकटाच आपल्या शेताकडे गेला. शेताकडे गेलेला महेंद्र परत आलाच नाही. त्याने आपल्या शेतामध्येच रात्री आठच्या सुमारास स्वत:च सरण रचत आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी
घेतली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्या निराशेपोटी आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली आहे.




