जामखेड न्युज – – – – –
इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेमध्ये अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्याना इयत्ता १ ली व २ री मध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश देण्यासाठी १० मार्च पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अनुसूचित जमाती सह पारधी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन राजूर (ता.अकोले) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी केले आहे.
विनामुल्य अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजुर, ता. अकोले जि. अहमदनगर तसेच उप कार्यालय, आदिवासी विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा) अहमदनगर येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
या शाळेमध्ये प्रवेशासाठी विदयार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, इ. १ ली साठी विदयार्थ्याचे वय ३० सप्टेंबर २०२२ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे, इयत्ता २ री साठी सन २०२२-२३ मध्ये इयत्ता १ लीत प्रवेशित असल्याबाबत बोनाफाईड सर्टिफिकेट, पालकाचा मागील वर्षाचा रूपये १ लाखाच्या आत उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला, पालकाचे / विदयार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, पालकाचे रहिवासी दाखला , अंगणवाडी / ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला, पालक दारिद्ररेषेखालील असल्यास ग्रामसेवकाचा दाखला / शिधापत्रिका छायाप्रत, महिला पालक विधवा / घटस्फोटित/निराधार असल्यास प्रमाणपत्र, विदयार्थ्याच्या आधार कार्डची छायाप्रत आणि पासपोर्ट साईज दोन फोटो या कागदापत्रची पूर्तता करुन अर्ज सादर करावेत.
अधिक माहितीसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) एन.डी.गायकवाड यांच्याशी ०२४२४-२५१०३७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन ही प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी केले आहे.