जामखेड न्युज – – – –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्यावतीने बारामतीच्या गिरीराज हॉस्पिटलच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात गेल्या पाच वर्षांत हृदयरोगाशी संबंधित तब्बल ४ हजार ७०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आमदार रोहित पवार या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील कै. अनंतराव पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘अनंत आरोग्य सेवा अभियान’ सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून व बारामतीच्या गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या ‘कै. रा. तु. भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठान’च्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर घेतले जाते. यंदा या शिबिराचे ५ वे वर्ष आहे. यामध्ये राज्यभरातील गरजू रुग्णांची अँजिओप्लास्टी, ऍन्जिओग्राफी, बायपास व इतर सर्जरी मोफत करण्यात येतात. या शिबिरात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांच्या जेवणाची व राहण्याचीही उत्तम सोय मोफत करण्यात आली होती.
गेल्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या या शिबिराला राज्यभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आधी या शिबिराचा कालावधी १२ जानेवारीपर्यंत होता. परंतु नागरिकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे शिबिराचा कालावधी नंतर १ महिन्याने वाढवण्यात आला. हे शिबिर १२ फेब्रुवारी रोजी संपले असून या शिबिराच्या माध्यमातून ५ वर्षात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास व इतर अशा एकूण ४ हजार ७४५ शस्क्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये ३ हजार १४५ नागरिकांच्या ऍन्जिओग्राफी, १ हजार ६९ अँजिओप्लास्टी, ४२१ बायपास तर ११० इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात येतात.
इच्छाशक्ती असेल तर एखादा लोकप्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत कसा पोहचवू शकतो, याचे एक मूर्तीमंत आणि राज्यातील सर्वच आमदारांनी आदर्श घ्यावा असे उदाहरण आमदार रोहित पवार यांनी या शिबिराच्या माध्यमातून घालून दिले. याबाबत नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.
चौकट
हृदयरोगाशी संबंधित शस्त्रक्रिया सामान्य कुटुंबातील रुग्णांना परवडणाऱ्या नसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सामान्य कुटुंबातील नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांना दिलासा देण्याचे काम केले. खासगी रुग्णालयात याच शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे रु. २६ कोटीहून अधिक रुपये खर्च आला असता. परंतु आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारामुळे या कुटुंबांचा शस्त्रक्रियेवरील खर्च वाचून त्यांना दिलासा मिळाला.
चौकट
बारामती येथील गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या ‘कै. रा. तु. भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठान’चा रुग्णसेवेसाठी नेहमी पुढाकार असतो. आतापर्यंत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ३५७ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून सुमारे चार लाख लोकांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.