जामखेड न्युज – – – –
नगरपंचायत निवडणूकीच्या उर्वरित चार प्रभागात मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. तर ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या चार जागांवर ८७ टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT 

ओबीसी आरक्षणामुळे कर्जत नगरपंचायतमधील चार प्रभागातील निवडणूकांसाठी मतदान झाले. गायकरवाडी प्रभागात ६७३ मतदारांपैकी ६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नेवसे मळा, ढेरेमळा, समुद्रमळा या प्रभागात ११२७ मतदारांपैकी ९७९ मतदारांनी मतदान केले. पोस्ट ऑफिस प्रभागात ७३४ मतदारांपैकी ६२२ मतदारांनी मतदान केले तर बुवासाहेबनगर प्रभागात ७८६ मतदारांपैकी ६३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कर्जत नगरपंचायत निवडणूकीत दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही टप्प्यात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. बुधवारी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. आठ टेबलद्वारे मतमोजणीच्या तीन फेऱ्याद्वारे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. मतमोजणीकडे सर्व उमेदवारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कर्जतकर नेमका कोणाला कौल देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची प्रतिष्ठा तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे अस्तित्व सिद्ध करणारा निकाल असेल.